भाजपने घातला शरद पवारांना दुग्धाभिषेक!

Foto
दूध दरवाढ आंदोलन
दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुग्धाभिषेक घालून लक्ष वेधले. राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे असल्याने मुख्यमंत्र्यांना डावलत भाजपने पवारांवर निशाणा साधला असे बोलले जाते.
राज्यात गेल्या काही दिवसापासून दूध दरवाढीचा प्रश्न पेटतो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई-पुणे भागात जोरदार आंदोलन केले होते. आता भाजपनेही या आंदोलनात उडी घेतली असून राज्यभर कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.शहरातील दूध डेरी चौकात आ.अतुल सावे यांच्या उपस्थितीत सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून टाकला. महाविकास आघाडीसरकार हाय हाय, दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, गाईच्या दुधाला खरेदीच्या प्रतिलिटर 30 रुपये भावा द्यावा, दूध भुकटी निर्मितीसाठी पन्नास रुपये अनुदान द्या, गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी कचरु घोडके, माधुरी अदवंत, जालिंदर शेंडगे, हेमंत खेडकर, नगरसेवक शिवाजी दांडगे, राज वानखेडे, समीर राजूरकर, दीपक बनकर, अजय शिंदे, अरुण पालवे, लक्ष्मीकांत थेटे, बालाजी मुंडे आदींची उपस्थिती होती. 
दरम्यान, आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांनी चक्क शरद पवार यांचे कागदी कट आउट हातात घेतले होते. आघाडी सरकार बरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही भाजपने टार्गेट केले.
 शरद पवार यांच्या प्रतिमेवर कार्यकर्त्यांनी दूध ओतत दुग्धाभिषेक घातला. महाविकासआघाडी चा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळेच भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टाळून थेट शरद पवारांवर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पवारांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण :  आ. सावे 
महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांच्या इशार्‍यावर काम करते आहे. पवार देशाचे कृषिमंत्रीही राहिले आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नांची पवारांना जाण आहे. मात्र त्यांनीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांना दुग्धाभिषेक घातला, असे आ. अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.
भाजपतर्फे राज्यभर आंदोलन
मुंबई दुधाच्या दरात वाढ करावी व प्रतिलिटर अनुदान द्यावे. या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी, रयत पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी सकाळी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दुधाचा टँकर अडवून रस्त्यावर रिकामा करून शासनाचा निषेध केला.